Posted by: Nivedita Barve | सप्टेंबर 22, 2008

दूर कुठेतरी हिरव्या रानात…

गेले काही दिवस बेबलॉश्कीला खूपच जास्त काम पडलं होतं. काम एकदम महत्त्वाचं होतं, ऑफिसमधल्या सर्व वरिष्ठांच त्यावर लक्ष होतं. शेवटी जेव्हा सर्व गोष्टी करून संपल्या तेव्हा बेबलॉश्की आतुरतेनी वरिष्ठांच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला. पुढचे काही दिवस काहीच कळलं नाही तेव्हा त्याला थोडसं अस्वस्थ वाटू लागलं आणि पुढच्या चार दिवसांनी त्याला टेन्शनच आलं. त्याला असं महत्त्वाच्या घडामोडींच्या मधे असणं कससंच वाटू लागलं होतं. शेवटी त्याने विचार केला “बहुतेक कामाचा ताण पडतोय जास्त, कुठंतरी निवांत भटकायला गेलं पाहिजे, काळं-हिरवं मांजर पण कंटाळलंय. एखाद्या हिरव्यागार झाडांच्या सानिद्ध्यातल्या काळ्या मातीच्या प्रदेशात जावं. मांजराला छान वाटेल तिथं, कॅमोफ्लाज झाल्यासारखं. कधी-कधी आपल्याला कोणी वेगळं काढून ओळखत नाही हे सुखावणारं असतं!”
दोन आठवड्यांनी कंपनीला मोठा फायदा झाल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना कौतुकाची इ-मेल पाठवण्यात आली. बेबलॉश्की त्या रविवारी मांजराबरोबर जवळच्या एका गडावर फिरायला गेला. तिथल्या गर्द वनराईत झाडाच्या सावलीत त्याला गाढ झोप लागली. कोणीही त्याला डिस्टर्ब केलं नाही आणि मांजर मनमोकळेपणानं उंडारत राहिलं.

Posted by: Nivedita Barve | ऑगस्ट 4, 2008

इथलं आणि तिथलं… किंवा कुठलंही

बेबलॉश्की दुपारचा फळं खात बसला होता, त्याच्या आवडीचं सिताफळ आणि ज्याच्या विषयी त्याचं फार काही मत नव्हतं असं सफरचंद. चाळा म्हणून तो विचार करू लागला, “हे सफरचंद कुठून आलं असेल, आणि हे सिताफळ?” तो राहतो त्या जवळच्याच जिल्ह्यात मुबलक सिताफळं पिकतात हे त्याला ठाऊक होतं. दुसऱ्या देशांमधे सिताफळं मिळत असतील का? असा प्रश्न त्याला पडला आणि मिळत नसतील तर तिथल्या लोकांविषयी त्याला हळहळही वाटली. दुसऱ्याच क्षणी सफरचंद ‘New Zealand’ मधून आलंय याची त्याला खात्री पटली, कारण त्यावर तसं लेबलच चिकटवलेलं होतं. मग त्याला एक भन्नाट कल्पना सुचली, त्यानं सफरचंदाचं लेबल काढून अलगदपणे सिताफळावर लावलं.मग खूष होत त्यानं New Zealand चं सिताफळ मटकवायला सुरुवात केली आणि थोडसं काळ्या-हिरव्या मांजरालाही देऊ केलं. पण New Zealand च काय, कुठल्याच देशातलं सिताफळ मांजराला आवडत नसल्यामुळे बेबलॉश्कीकडे एक तिरस्कारपूर्ण कटाक्ष टाकून ते तिथून पसार झालं!

काळं-हिरवं मांजर चिडचिडलं होतं. आख्खं घर पालथं घालून झालं तरी त्याला त्याचं झोपायचं खोकं सापडलं नव्हतं आणि त्यात भरीस भर म्हाणजे त्याला आता खूप झोपही यायला लागली होती. मांजराचा मुळातला प्लॅन तसा साधाच होता, नेहमीच्या ठिकाणी जाऊन खोक्यात ताणून देणे! पण आजचा दिवस वेगळा होता, खोकं नेहमीच्या जागी नव्हतंच. आधी मांजराचा विश्वास बसेना पण मग घटनेचं गांभीर्य ओळखून त्यानी आजु-बाजूची ठिकाणं धुंडाळायला सुरुवात केली. मग इतर खोल्या शोधल्या आणि शेवटी बागेतही जेव्हा खोकं सापडलं नाही तेव्हा मांजर हताश झालं, झोपही दाटून आल्यामुळे त्याच्या नकळतच त्याची पावलं नेहमीच्या ठिकाणी वळली. खोकं अर्थातच नव्हतं.
बेबलॉश्की मांजराची सगळी धावपळ पाहत होता. त्याला खरंतर कळतच नव्हतं की मांजराला काय हवंय ते, पण जेव्हा मांजर भटकून परत आलं तेव्हा बेबलॉश्कीला उमगलं की मांजराला झोप आली आहे. मग बेबलॉश्कीने मांजराला उचलून घेतलं, त्याला लाडाने कुरवाळलं, मांजराला हे attention खूप छान वाटलं पण त्याच वेळी एक नवाच विजेसारखा विचार त्याच्या मनात लखलखला “… कदाचित खोकं हरवण्याच्या मागे बेबलॉश्कीच असावा, पण बेबलॉश्कीला त्यातून काय साद्ध्य होणार आहे? पण बेबलॉश्कीच्या बऱ्याच गोष्टींना तसा अर्थ नसतोच बरेचदा, तसंच असावं हे…” मांजराचे विचार चालू असतानाच बेबलॉश्कीने त्याला छानपैकी जुन्या खोक्याच्या जागी ठेवलेल्या नवीन बास्केट मधल्या मऊ गादीवर झोपवलं..

Posted by: Nivedita Barve | मे 25, 2008

गोल-गोल तरंग

ती आर्ट गॅलरी एक मस्त गोल प्रकरण होती. तिच्या मध्यावर एक गोल जिना होता, त्या चार मजल्यांना जोडणारा. प्रत्येक मजल्यावर भारी भारी मजेच्या गोष्टी ठेवल्या होत्या… उदाहरणार्थ पहिल्या मजल्यावर एक प्रवाशाची ट्रंक होती आणि त्यात निळं निळं आभाळ भरलेलं होतं. दुसऱ्या मजल्यावर कोपऱ्यात खूप वाद्यं ठेवलेली होती. बटन दाबताच ती स्वत:च वाजत होती. मग काही बोर्डांवर जुन्या जाहिराती आणि कात्रणं होती तर काही क्लिष्ट गणिती प्रमेयं गंभीर डिझाईन्स बनवत होती.
अशा या अनेक मजले-मजलेभर पसरलेल्या गोष्टी कशासाठी होत्या किंवा त्यांचा काय उपयोग होता हे कळणं अवघडच होतं. त्यामुळेच बहुतेक गॅलरी तशी रिकामीच होती आणि सगळ्या गोष्टी शांततेच्या जड वेष्टनात गुंडाळल्यासारख्या होत्या.
अचानक तरंग उठावेत तशी टक-टक-टक-टक चार छोटी टाळकी गॅलरीत आली. विस्फारलेल्या नजरांनी त्यांनी आकाशाची पेटी वाकून वाकून पाहिली तर बुद्धीबळाच्या आठ भलत्या-भलत्याच आकाराच्या पटांवर ते खूपच खूष झाले. टीवी चे संच, विचित्र चित्रं, डब्या, खेळणी असं बघत बघत मंडळी चौथ्या मजल्यावर पोचली आणि तिथून तळमजल्याच्या मध्यावर ठेवलेल्या पियानोकडे बघायला लागली. वरून डोकावणारी चार टाळकी जणू त्या शांततेच्या fluid मधे उचंबळणारे तरंगच वाटत होती.

Posted by: Nivedita Barve | एप्रिल 12, 2008

त्याच्या चौकटीतला लयदार प्रदेश

बेबलॉश्कीच्या कपड्यांचा पसारा भलतीकडेच पसरला होता तर काळ्या-हिरव्या मांजराचं झोपण्याचं खोकं उलटीकडे पडलं होतं. खिडकीबाहेरच्या गुलमोहोराची पानं वाऱ्याने हलत होती आणि बेबलॉश्कीचं इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असं अधुन-मधून चालंलं होतं. आरशातल्या चौकटीतून काळं-हिरवं मांजर या सगळ्या गोष्टी आणि हालचालींकडे पाहत बसलं होतं. का कोणास ठाऊक काही वेळानी त्याला चौकटीत एक विचित्र लय जाणवू लागली. पुस्तकांचे ढिगारे तलम सुळसुळीत होऊन खुर्चीच्या हातावर पडले आणि झोपण्याच्या खोक्याचं सरळ रेषांचं त्रिमितीय रूप तर फारच आकर्षक भासू लागलं. आणि बेबलॉश्की तर अजिबातच कंटाळवाणा वाटत नव्हता… त्याचं वावरणं झोक्यांच्या लयीत घडत असल्यासारखं वाटत होतं. अचानक बेबलॉश्की मोठा मोठा मोठा होऊ लागला आणि मांजराला वाटू लागलं तो आता चौकटीतून बाहेरच येणार आहे, तोच बेबलॉश्कीच्या हातात मांजराला स्वत:चं काळं-हिरवं रुपडं दिसू लागलं. मग मांजराला झोक्यांच्या लयीमुळे किंचित भोवळल्यासारखं झालं.

कित्येक दिवस खूप साहित्यिकांच्या खूप थोर कलाकृती वाचून झाल्यावर बेबलॉश्कीला वाटले आपणही काहीतरी लिहावे. त्याने एक नवी कोरी रेघारेघांची वही आणली आणि एका नव्या कोऱ्या काळ्या पेनाने लिहायचे ठरवले. पण आता काय लिहावे हा प्रश्न निर्माण झाला. मग डोक्यात जो पहिला विचार आला त्यावर त्याने लिहायला सुरुवात केली तर त्याला दोन ओळींतच लक्षात आलं की एका साहित्यिकाने त्यावर आठ खंड आधीच लिहून ठेवले आहेत. मग दुसऱ्या नंबरच्या विचारावरचा त्याला हायकू संग्रह आठवला. तिसऱ्या आणि चौथ्या विषयाचीही अशीच अनुक्रमे एका ब्लॉग आणि दिर्घांकामध्ये वासलात लागल्यावर बेबलॉश्कीला एकदम कोंडीत सापडल्यासारखं वाटू लागलं. त्यात त्याला वहीची पानंही उष्टी झाल्यासारखी वाटू लागली. तो मग भयंकर अस्वस्थ झाला आणि त्यानं पटकन वहीची लिहिलेली पानं फाडून टाकली.
वही spiral binding ची असल्यामुळे पुन्हा नवी कोरी दिसू लागली. त्या शुभ्र पानांकडे बघता बघताच बेबलॉश्कीच्या मनात विचार आला “या कोऱ्या पानासारखाच माझा हा प्रयत्न नवा कोरा आहे, कदाचित आधी कोणी कोणी महान लोकांनी सर्व विचारांवर लिहून ठेवलेलं असेलही, पण माझे विचार तर माझ्या आयुष्यावरचेच तर आहेत ना!! कदाचित माझं लेखन कोणाला खूप थोर वाटणारही नाही पण माझ्या आयुष्यावरचे माझे विचार तर फक्त मीच लिहू शकतो!!” बेबलॉश्कीला आता डोक्यातल्या सर्वच्या सर्व गोष्टी लिहून काढायची तीव्र निकड भासू लागली.
मग सुरुवातीच्या आखीव-रेखीव हस्ताक्षराचं अखर-वखर शब्दांत रुपांतर होईपर्यंत तो लिहितच राहिला.

Posted by: Nivedita Barve | मार्च 2, 2008

ती गेली तेव्हा

त्या एका सुरेख दिवशी, काळ्या हिरव्या मांजराला खूपच कंटाळा आला होता. काय कारण होतं कोणास ठाऊक पण त्याला नेहमीसारखं काहीच वाटत नव्हतं. नेहमीसारखं म्हणजे उनाडावं, झोपावं, आळसावं या प्रकारचं काहीच त्याला वाटेना. थोडं त्राग्यानीच ते दारातून बाहेर पडलं आणि निरुद्देश चालू लागलं. त्याला पाहताच शेजारच्या जाड़्या कुत्र्यानी जोर जोरात भुंकायला सुरुवात केली, पण मांजराला आज socialization चा मूड नव्हता, त्यानी जाड्या कुत्र्याकडे दुर्लक्ष केलं. कुत्रा तरीही नेटाने भुंकत राहिला. गल्लीला चार फेऱ्या मारून झाल्या, कचराकुंडीत नाक घालून झालं, कोपऱ्यावरच्या बंगल्यात उडी मारून झाली तरीही मांजराला छान वाटेना. मग ते गुलमोहोरावरच्या एका विविक्षीत फांदीवर चढून बसलं. ती त्याची आवडती जागा होती, तिथून त्याला त्याचं घर आणि ओळखीची इतर चार दोन घरं दिसायची. आताही बेबलॉश्की कुंपणावरून पलीकडच्या घरातल्या बाईंशी बोलताना दिसत होता. मांजराला वाटलं “बेबलॉश्की किती बडबड करतो..नेहमीच…त्यातली अर्धी बडबड तर निरर्थकच असते..जेव्हा तो खाऊ देतो तेव्हाच काय तो त्याच्या बोलण्याला अर्थ असतो, एरवी नुसतेच वेगवेगळे आवाज करत बसतो..आत्ता ज्यांच्याशी बोलतोय त्या बाईही अशाच… पण त्यांची मांजर व्यवस्थीत बोलते..सगळं समजतं तिचं बोलणं..पण कालपासून तीही नसणारच आहे आता..तिला आचरटासारखं माणसं बघायला जायचं होतं म्हणे…Cat show ला..कित्ती कंटाळवाणं आहे सगळं!”
मांजराला गुलमोहोरावरच्या आवडत्या जागीही मजा वाटेना, त्यानं खाली उडी मारली आणि परत गल्लीच्या फेर्या आणि फाटकांवरच्या उड्या सुरू केल्या.

Posted by: Nivedita Barve | फेब्रुवारी 13, 2008

झोप

सकाळचे साडेआठ वाजले होते आणि छोटा पिकू गाढ झोपेत होता. पिकूची आई त्याला उठवायला आली “पिकू उठ रे बाळा, सूर्य केवढा वर आलाय बघ!” पिकू ढिम्म हलला नाही कारण त्याला काही ऐकूच गेलं नाही. तेवढ्यात पिकूचे बाबा म्हणाले, “झोपू दे गं त्याला, थंडीचे दिवस आहेत..आणि आज नाहीतरी सुट्टीच आहे त्याला.” आईला असं बेशिस्त वागणं आवडलं नाही पण ती काही म्हणाली नाही.
मग असेच जेव्हा दहा वाजले आणि तरीही पिकू उठायचं नाव काढेना तेव्हा बाबांनीच त्याला बळंबळं उठवलं. पिकू कष्टानेच उठला, त्याला हे सगळं प्रकरण बिलकूलच आवडलं नाही. त्याला खरंतर अजून खूप झोपायचं होतं. त्याला बाईंनी शाळेत शिकवलेल्या काय काय गोष्टी आठवू लागल्या की खारूताईंसारखे प्राणी थंडीचे सर्व दिवस झोपून काढतात… पिकूनी मग जोरात भोकाड पसरलं.

Posted by: Nivedita Barve | जानेवारी 28, 2008

थोर साहित्यिकांचे विचार आणि मांजर

त्या दिवशी झोपेतून अर्धवट जाग येत असतानाच बेबलॉश्कीच्या मनात वाचनाची आवड निर्माण झाली. पूर्ण जाग येईपर्यंत ती बरीच तिव्रही झाली. मग आवरासावर करून तो तडक पुस्तकांच्या दुकानात गेला. साहित्याच्या विविध झऱ्या-नाल्या-समुद्रांमधे तो बराच काळ डुंबत राहिला. जवळ-जवळ दोन तासांने जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा हातात पुस्तकांची मोठी चळत आणि चेहेऱ्यावर कृतकृत्य भाव घेऊनच. मग नेहमीसारखा बाजारात इकडे-तिकडे न भटकता तो तडक घरी आला. एका थोर साहित्यिकांचं पुस्तक त्याने आल्या-आल्या वाचायला घेतलं. पुस्तक संपेपर्यंत तो जराही जागचा हलला नाही, अगदी काळ्या-हिरव्या मांजराला उनाडायचं उधाण आलं तरीही नाही. पुस्तक मिटलं तेव्हा तो विचारांच्या चक्रांमध्ये अडकून गेला. त्याला पुस्तक खूपच आवडला होतं. तो विचार करू लागला, “माझे विचार लेखकाच्या विचारांशी तंतोतंत जुळतात….आणि लेखक थोर आहेत..म्हणजे खरंतर मीही थोर आहे की काय??!!” या धक्कादायक विचाराने बेबलॉश्की एकदम भांबावून गेला! त्या वेळी, थोर साहित्यिकांचे पुस्तक बेबलॉश्कीकडे असल्यामुळे काळ्या-हिरव्या मांजराला एका कमी थोर लेखकाच्या पुस्तकावरच आपली नखं खरवडून साफ करावी लागली.

Posted by: Nivedita Barve | जानेवारी 2, 2008

दुर्दम्य आशावाद आणि निकराची लढाई

त्या दिवशी खूप जोराचा पाऊस पडत होता. अगदी ढगांच्या गडगडाटा – विजांच्या कडकडाटासह. मग दिवेही गेले आणि बेबलॉश्कीला खूपसा कंटाळा आला. अंधारात काय करू शकणार होता तो? त्याने चाळा म्हणून रुबिक्स क्युब हाताशी घेतला. त्या क्युबने आधीही ’न सुटून’ बेबलॉश्कीचे अनेक आठवडे मनोरंजन केले होते. मेणबत्तीच्या उजेडात क्युबचे नारींगी-लाल रंग एकसारखेच दिसत होते. बेबलॉश्कीने विचार केला, तसं तर तसं, जर क्युबचं कोडं सुटलं तर काय हरकत आहे? आधी नीट लक्ष देऊन तो क्युब फिरवू लागला, पण मग काहीच सुटेनासं झाल्यावर त्यानी तो आडवा-तिडवा हाताला लागेल तसा फिरवायला सुरुवात केली. थोड्यावेळानी मेणबत्तीही विझून गेली, तरी बेबलॉश्कीचा चाळा सुरुच होता. अंधारात त्याच्या क्युबचा कडकड आवाज बराच वेळ येत राहिला. नंतर रात्री कधीतरी त्याला झोप लागून गेली तेव्हा कुठे त्याचे निकराचे प्रयत्न थांबले.
सकाळी त्याला लवकरच जाग आली. आळस वगैरे देत असतानाच त्याला अचानक क्युबची आठवण झाली. त्यानी अधीरपणे इकडे-तिकडे पाहिलं. मेणबत्तीच्या गोठलेल्या तळ्याशेजारी गरीबपणे पडलेला क्युब सुटलेला नव्हताच.
कित्येक दिवस-महिने मग तो धुळीचे थर पांघरत पुस्तकांच्या कपाटात पडून राहिला.

« Newer Posts - जरा जुन्या पोस्ट्स »

प्रवर्ग