Posted by: Nivedita Barve | जानेवारी 1, 2010

चल माऊ दूर जाऊ!

“मांजरा, आज काय काय गोष्टी घडल्यात! आपल्याला कामासाठी काही दिवस दूरच्या मोठ्ठ्या गावाला जावं लागणार आहे. आणि गंमत म्हणजे त्याच काळात काही अतिशय प्रख्यात चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन तिथे भरणार आहे! वा वा काय छान योगायोग आहे पहा!”

काळ्या-हिरव्या मांजराला काहीच घेणं नव्हतं. बेबलॉश्की नुकताच कामावरून परत आला होता आणि तो आता कधी बशीत दूध ओततोय याचीच फिकीर मांजराला पडली होती. पण असं जरी असलं तरी मांजराला बेबलॉश्कीच्या उत्साहाचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नव्हतं. एरवी या वेळेला बेबलॉश्की पुर्ण ढेपाळलेला असायचा आणि पाय ओढतच घरात फिरायचा. पण आज मात्र तो एकदम तरतरीत दिसत होता. परत नेहमीसारखं टी. व्ही. बघत तो पसरला नव्हता तर त्यानं कपाट आवरायला काढलं होतं! त्याने आधी कपाटातले सगळे कपडे बाहेर काढले आणि ते परत कपाटात लावायला घेतले. काही कपडे कपाटात मावले नसावेत असं मांजराला वाटलं कारण त्यानी ते एका मोठ्या बॅगेत भरून टाकले.
“बेबलॉश्कीकडे जरा जास्तच कपडे आहेत!” मांजराच्या तल्लख डोक्यात विचार आल्यावाचून राहिला नाही.
कपाट आवरल्यावरही बेबलॉश्कीचा उत्साह ओसरला नाहीच, त्यानी आता स्वयंपाकघराकडे आपला मोर्चा वळवला. अनेक छोट्या-मोठ्या डब्यांमधे त्याने काय काय पदार्थ भरले आणि ते सर्व डबे एका पिशवीत भरून ठेवले. ही कसली आवरा-आवरी हे काही मांजराला कळलं नाही कारण हे सर्व करून झालं तेव्हा जास्तच राडा झाल्यासारखा त्याला वाटला. यातून फक्त एकच चांगली गोष्ट निष्पन्न झाली, ती म्हणजे बेबलॉश्कीनी दूधाचं आख्खंच पातेलं आज मांजराच्या बशीत उपडं करून टाकलं.
इतका वेळ मांजर बेबलॉश्कीच्या करामती मजेत पहात बसलं होतं, पण बेबलॉश्कीने आता त्याचा मोर्चा मांजराच्या वस्तूंकडे वळवला. तो आता मांजराची खेळणी, खाण्याचा डबा वगैरे गोष्टी एका पिशवी भरायला लागला, मग मात्र मांजर बेचैन झालं. त्यानं चलाखपणे आपल्या बास्केट मधे उडी घेतली, न जाणो बेबलॉश्की त्याची बास्केटही एखाद्या बॅगमधे बंद करून टाकायचा ही भिती त्याला पडली. आता इथून हलायचं नाही की आपली बास्केटही हलवू द्यायची नाही असं त्यानं ठरवलं.
“मला हे तुझं भारी आवडतं मांजरा! मी बोललेलं सगळं तुला कळतं. नुसतं प्रवासाला जायचं म्हटलं तर लगेच बास्केट मधे शहाण्यासारखा शिरून बसलास” बेबलॉश्की म्हणाला.
आज नेहमीपेक्षा जास्तच दूध प्यायल्यामूळे की काय बास्केट मधल्या मऊ दुलईचा स्पर्श होताच मांजराला पटकन झोप लागून गेली! स्वप्नात त्याला बेबलॉश्की जवळ जवळ आख्खं घरंच विविध लहान मोठ्या बॅगांमधे कोंबतोय असं दिसत राहिलं.
बेबलॉश्की मात्र सामान पॅक करता करता एकीकडे “हिस्टरी ऑफ पेंटींग फॉर डमीज” चं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होता.सर्वांचा प्रवास मजेचा होवो!!

सर्व वाचक आणि लेखक मित्र-मैत्रिणींना नव्या वर्षाच्या शुभेच्छा! गेल्या ब्लॉग पोस्ट मध्ये, ’बारनू’ एका बहुउद्देशीय अगाध प्रवासाला निघाला, आणि त्याचबरोबर आता ’बेबलॉश्की आणि काळं-हिरवं मांजर’ देखील एका मोठ्याश्या गावी प्रवासाला निघाले आहेत. त्यांचे प्रवास अनुभव संपन्न आणि आनंददायक असतील ह्याची खात्री आहे! पण ह्याच ’चांगल्या नोटवर’ मी आणि देबु देखील एका नव्या प्रवासाला निघतोय. (Though we are not sure where our journey will finally lead us, but we definitely feel that it is about time that we started in that direction.) त्यामुळे ब्रेक घ्यावा लागतोय. पुन्हा लवकरात-लवकर ’काचा-कवड्या’ला परतण्याचा प्रयत्न करु. आपल्या सर्वांचा ’ब्लॉग-सहवास’ अमुल्य आहे आणि त्यासाठी अम्ही मन:पूर्वक आभारी आहोत. सर्वांचाच प्रवास मजेचा होवो ह्या शुभेच्छा!

कळावे लोभ असावा,
निवेदिता

Advertisements
Posted by: Nivedita Barve | डिसेंबर 13, 2009

शोध, हरवलेल्याचा आणि त्या पलीकडचा

सर्व दिशांना तलम शांतता पसरली होती, नेहमी असते तशीच. शांतता आणि अंधार, तोही नेहमीचाच. कधीमधी एखादा तुटता तारा या दोन्हीला भेदून कुठच्यातरी अदृश्य आकर्षणाच्या मागे धावायचा तेवढाच काय तो बदल. अवकाशाचं हे कोंदण बारनूला फार आवडायचं कारण अवकाशात तरी त्याच्या मागे लागलेले प्रश्नांचे भुंगे त्याची पाठ सोडायचे, काही काळापुरते का होईना.  
पण आज का कोणास ठाऊक अवकाशाच्या निर्वात पोकळीतही त्याचं मन काही निर्विचार होत नव्हतं, प्रयत्न करूनही नको त्या गोष्टी मनात शिरून त्याच्या आयुष्यातल्या त्या दुखऱया जागेला टोचणी लावून जात होत्या. नकळत त्याची नजर त्याच्या डाव्या पायाकडे गेली आणि त्याला अजूनच उदास वाटायला लागलं.
या सगळ्या दुखा:चं कारण होतं बारनूचा डावा बूट! बारनूच्या पायांकडे नीट लक्ष देऊन पाहिलं असतं तर दिसलं असतं की त्याच्या डाव्या पायातला बूट हा उजव्या बूटापेक्षा जास्त चमकायचा. कारण साधं होतं, डावा बूट हा त्याच्या उजव्या बूटासारखा ओरिजिनल त्याच्या आई-वडिलांकडून आलेला नसून रिन्दम ग्रहाच्या पायतान विभागानी दिलेला होता. रिन्दम वरच्या प्रत्येक माणसाला आई-वडीलांकडून एक बूटांचा जोड मिळायचा. ते बूट वाढत्या वयाप्रमाणे मापात पायाबरोबर वाढणारे असे असायचे. त्यातही डाव्या पायाचा बूट जास्तच महत्वाचा, कारण त्याच्या सोलमधे त्या व्यक्तीची फॅमिली-जेनेटीक-ट्री आखलेली असायची. त्यावरून त्या व्यक्तीला हे बरोबर कळायचे की त्याला कुठला रंग आवडतो, कुठचे खेळ खेळायला आवडतात, तो कुठच्या विषयांचा अभ्यास चांगला करू शकेल, कुठच्या व्यवसायात त्याने जावे इ. इ. एक प्रकारे डावा बूट हा त्या व्याक्तीची आयडेंटिटीच होता. आणि बारनू तीच हरवून बसला होता. लहानपणी कधीतरी त्यानी बूट कुठेतरी काढून ठेवला होता आणि तो नंतर त्याला कधीच सापडलेला नव्हता. त्याच्याकडे जर तो बूट असता तर त्याच्या सोलवरून त्याला लगेच कळलं असतं की वस्तूंचा शोध लावण्याच्या व्यवसायात त्याने पडू नये कारण त्या कलेत त्याला फार गती नाही. पण बारनूचा बूट हरवला होता आणि त्याला हे कळणं आता शक्य नव्हतं. मग बारनूला पुढचे सगळेच निर्णय अंदाजानेच घ्यावे लागले होते.
बारनूनी एक उसासा टाकला, सद्ध्यातरी त्याच्यावर बूटाचा नाहितर केशरी द्रव्याचा शोध घेण्याचे काम येऊन पडले होते. बारनूच्याच रीडींग्स नुसार हे स्पष्ट होतं की केशरी द्रव्यामुळे त्यांचं यान ३०% जास्त वेगानी धावत होतं आणि आता त्याच्या वरिष्ठांनी त्याला ते द्रव्य शोधण्याच्या कामावर पाठवलं होतं. पण मनातून त्याला बारीकशी आशा वाटत होती की केशरी द्रव्याचा शोध घेता घेता त्याला कदाचित त्याच्या बूटाचाही काही माग लावता येईल.


बारनूला यानाच्या काचेतून काळ्या आकाशात रिन्दमचा चमकता सूर्य उगवताना दिसला. कोणास ठाउक त्याला रिन्दमला कधी परत यायला मिळणार होतं? पण मनातून बारनूला खात्री वाटत होती की येणारे दिवस आणि कापले जाणारे अंतर त्याला वेगवेगळ्या अनेक चमकदार सूर्यांच्या भेटी घालून देणार होते! रिन्दमचा सूर्य बराच वेळ बारनूच्या  डोळ्यात चमकत राहिला…


वरील पोस्टशी संलग्न असलेले माझे पूर्वीचे पोस्ट्स खालीलप्रमाणे

अनोळखी ग्रहावरील ’द्रावक’ घटना! – मे २०, २००९

आले मोठ्या माणसाच्या मना… – जून १५, २००९

Posted by: Nivedita Barve | सप्टेंबर 19, 2009

निळ्या पाण्यात निळी शाई

arbits_kacha_kavadya_27आजचा दिवस काही बेबलॉश्कीसाठी बरा दिसत नव्हता. त्यानी सकाळी कॉफीत साखरेऐवजी मीठ घातलं, मग नीनाच्या ऐवजी भलत्याच कुणालातरी फोन लावला. हे सगळं कमी की काय म्हणून त्याने धुतलेलेच कपडे परत धुवून काढले! आपण खूप वेंधळ्यासारखं वागतोय हे त्याच्या लक्षात आलंच दुपारपर्यंत. मग त्याला फार ओशाळवाणं वाटायला लागलं.

तसं बघायला गेलं तर असे प्रसंग बेबलॉश्कीच्या आयुष्यात वरचेवर घडत, तो एकटा असतानाच नाही तर चांगल्या चार-दोन लोकांच्या साक्षीने घडत. एकदा जेवताना शर्टावर दही सांडलं आणि सगळे हसले तर एकदा तो वेगवेगळे सॉक्स घालून ऑफीसमधे गेला आणि सगळ्यांच्या ते लक्षात आलं. वाढदिवस विसरणं ठीक, पण बऱ्याचदा बेबलॉश्की वाढदिवस नसताना मित्र-मैत्रिणींना छानसं बर्थडे ग्रीटिंगकार्ड देत असे. खरंतर बेबलॉश्की आता चांगला मोठा झाला होता, असे प्रसंग त्याने निर्माणच होऊ द्यायला नको होते आणि असं काही झालंच तर ते किमान मनाला तरी लावून घ्यायला नको होतं. पण यातली कुठचीच गोष्ट त्याच्याचाने होत नव्हती. त्याला तर जुन्या गोष्टी नुसत्या आठवल्या तरी लाजल्यासारखं व्हायचं. मग असे नकोसे विचार डोक्यात नाचायला लागले की नकळतच तो एक गाणं गुणगुणायला लागायचा.


“निळ्या पाण्यात निळी शाई

मला काही आठवत नाही!

मला काहीच आठवत नाही!”

आताही तो हे गाणं बऱ्याच मोठ्या आवाजात गायला लागला होता.
काळ्या-हिरव्या मांजराला हा प्रकार बिलकुलच आवडला नाही. पण बेबलॉश्कीच्या या आचरट वागण्याचं काय करावं हे त्याला काही कळेना. शेवटी एक उसासा टाकून ते स्वत:शीच म्हणालं, “असा भेसूर आवाज काढल्याबद्दल बेबलॉश्कीला स्वत:बद्दल खूपच ओशाळवाणं वाटायला पाहिजे खरंतर!”.

Posted by: Nivedita Barve | सप्टेंबर 12, 2009

नीनाची भरजरी भेट

arbits_kacha_kavadya_26त्या दिवशी संध्याकाळी बेबलॉश्की नीनाला भेटायला तिच्या घरी गेला होता. ती गेले काही दिवस गावाला गेलेली असल्यामुळे बेबलॉश्कीला तिला भेटता आलेलं नव्हतं. आता तिच्या घराच्याबाहेर जेव्हा तो पोचला तेव्हा त्याला तिच्या घराची खिडकी उघडी दिसली. त्यानी आत डोकावलं तर त्याला नीना आत पुस्तक वाचत बसलेली दिसली. त्याला वाटलं तिची केस थोडे वाढलेत आणि तिचा रंगही त्याला थोडा सावळा झाल्यासारखा वाटला. थोडक्यात काय तर नीना त्याला नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती!
मग दार वाजवून वगैरे बेबलॉश्की घरात स्थानापन्न झाला तर नीनानी त्याच्यापुढे कसल्या कसल्या मिठाया ठेवल्या. मिठायांवर ताव मारता मारता तिचे प्रवासातले फोटोही बघितले बेबलॉश्कीनी. त्याला आता एकदम मस्त वाटत होतं, मिठाई त्याला आवडली होतीच आणि प्रवासातल्या गमती ऐकून त्याला खूप हसूही येत होतं. पण त्याच्या आनंदाचं खरं कारण हे होतं की आता त्याला हवं तेव्हा नीनाला भेटणं सहज शक्य होतं!
“हे बघ मी तुझ्यासाठी काय मज्जा आणलीय!” नीनानी एक पुडकं बेबलॉश्की समोर धरलं.
बेबलॉश्कीनी मोठ्या उत्सुक्तेनी पुडकं फोडलं तर आत होतं रंगीत काचा-मण्यांनी मढवलेलं भरजरी जॅकेट! ते जॅकेट बघून बेबलॉश्कीचे डोळे गर्र्कन फिरले! एव्हढं रंगीत-संगीत काहीतरी त्यानी इतक्या जवळून कधी बघितलंच नव्हतं!
“आवडलं ना तुला? घालून दाखव ना मला, आत्ताच्या आत्ता!” नीनानी गडबड सुरू केली.
बेबलॉश्कीला खरंतर जॅकेट घालायची भीतीच वाटली पण नीनाला तसं काही न दाखवता त्यानी गुपचुप जॅकेट अंगावर चढवलं. नीना खूष झाली आणि तिने संध्याकाळभर बेबलॉश्कीला जॅकेट घालून बसवलं आणि घरी जातानाही ते घालूनच पाठवलं.
बेबलॉश्की घरी पोचला तर मांजरानी उघड्या खिडकीतून त्याला आधीच पाहिलं आणि भितीने त्याच्या पाठीवरचे केस ताठ झाले! पण मग नीनानी आठवणीने पाठवलेला गोड खाऊ जेव्हा बेबलॉश्कीने त्याच्यापुढे ठेवला तेव्हा कुठं ते जरा शांत झालं. त्या अवधीत बेबलॉश्कीनी जॅकेट काढून कपाटात नीट ठेवून दिलं.

Posted by: Nivedita Barve | जून 15, 2009

आले मोठ्या माणसाच्या मना…

arbits_kacha_kavadya_25
“हं, कुठला रंग?” मेजा मागच्या मोठ्या माणसानं बारनूला विचारलं.
“केशरी.”
“आणि सापडलं कुणाला?”
“इंधन-शोधक बेडकाला.” यावर मेजा मागचा मोठा माणूस खुष होऊन स्वता:शीच हसला. शेवटी इं-शो बेडकांना भरती करून घेण्यात त्याचाच मोठा सहभाग होता.
“पण तुझी खात्री आहे ना?”
“हो हो, मी रीडींग्स तीनदा पडताळून पाहीली. जातानापेक्षा येतानाचा वेग ३०% जास्त होता.”
“आणि हे त्या पदार्थामुळे झालंय असं तुला वाटतंय… हं इंटरेस्टींग.. आपल्याला त्या पदार्थाचं विश्लेषण करायला हवं. तू काही नमुना बरोबर आणला आहेस?”
“नाही.”
“मग इं-शो बेडकानी आणलाय?” मोठ्या माणसानी आशेनी विचारलं.
“नाही.” इं-शो बेडकाच्या सारख्या सारख्या येणार्‍या उल्लेखानं किंचीत चिडून बारनूनं कोरडं उत्तर दिलं.
“मग ते स्वत:च तुमच्याबरोबर उडत आलंय?”
“नाही, ते त्या प्रकारचं द्रव नसावं”
“मग तुला परत जावं लागेल.”
“काय??!! पण ते शक्य नाहीये, तो ग्रह आपल्या नकाशातच नाहीये!”
मोठ्या माणसानं नाराजीनं डोकं हलवलं. या प्रकरातल्या कित्येक गोष्टी त्याला खूप खटकत होत्या. हा मुलगा वेगळ्या ग्रहावर पोचलाच कसा? तिथे त्याला विशेष वेगळं इंधन मिळण्याची शक्यता तरी किती होती? साधी नेहमीची रूटीन फेरी करताना अशी गोष्ट कशी घडली? मोठ्या माणसाला हा प्रकार नक्कीच फारसा पटला नव्हता.
“मला १५ दिवसात त्या पदार्थाविषयी पूर्ण माहिती हवी आहे.”
बारनूला एव्हाना कसंनुसं व्हायला लागलं होतं. त्या ग्रहावरून घाईघाईनं निघाल्यामुळे त्याला नीटसं कळलंच नव्हतं की ते ठिकाण कुठं आहे. १५ दिवसात ते शोधणं अशक्यच होतं. त्याला श्वास कोंडल्यासारखा वाटायला लागला. जर त्याला हे जमलं नाही तर पुन्हा त्याला कुठचंही जबाबदारीचं काम मिळणार नव्हतं, म्हणजे अवकाशात परत जाण्याचा प्रश्नच नव्ह्ता. तसं झालं तर ते फारच वाईट होतं. बारनूच्या पोटात गोळा आला. त्याचा चेहरा वेडावाकडा झाला आणि पाय कापायला लागले. मोठा माणूस दचकून बारनूकडे पाहू लागला. बारनूला हात द्यायला तो उठला तोच बारनूचे पाय लटपटून तो गुढघ्यावर बसला. मोठ्या माणसाने घाबरून त्याच्या सहकार्‍यांना हाकारलं. पण ते येण्याआधीच बारनू जोरात थरथरला आणि मोठा माणूस डोळे फाडून बघत असतानाच त्यानी एक मोठा ढेकर दिला! मोठा माणूस दचकून मागे सरकला. या मुलाला काय झालं असावं याचे चित्र-विचित्र विचार त्याच्या मनात येऊ लागले. तो बारनूकडे संशयाने बघत राहिला पण बारनूला मात्र आता हलकं आणि छान वाटू लागलं होतं.
पण हा काय विपरीत प्रकार घडला याचं कारण मात्र त्याला काही सांगता आलं नाही.

अ)

arbits_kacha_kavadya_24उडती तबकडी कशीबशी हेलपांडत भिंतीच्या मागच्या बाजूला उतरली. लगेचच तबकडीचं दार उघडलं आणि बारनू बाहेर पडला. उतरताच त्यानं इकडे-तिकडे बिलकुल न बघता नाकासमोर चालायला सुरूवात केली. तसं करणं खरंतर फारसं सोयीचं नव्हतं कारण नाकासमोर एक सरळसोट भिंत उभी होती! पण बारनू तरी काय करणार होता बिचारा? एकतर त्याच्या तबकडीनं गपगार व्हायला जी जागा निवडली होती ती त्याच्या नकाशात नोंदलेलीच नव्हती आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे अशी काही ठिकाणं ब्रह्मांडात अस्तित्वात आहेत हेच त्याला माहीत नव्हतं. मग अशावेळी त्याच्या ग्रहावर प्रसिद्ध असलेली एक म्हणच त्याच्या उपयोगी आली “अनोळखी ग्रहावर नाकासमोर चाला आणि इकडे-तिकडे ढुंकुनही पाहू नका.” पण याच म्हणीमुळे खरंतर बारनूचा भिंतीवर आपटून आता कपाळमोक्षच होणार होता इतक्यात “ड्रक ड्रक ड्रॅव ड्रॅव” असा संकेत देत इंधन-शोधक बेडुक उसळ्या मारू लागला. इं-शो बेडकाकडे दचकून बघत बारनू त्यानी दर्शवलेल्या दिशेला गेला.
एका विचित्र लांबोडक्या मेजावर एक भलंमोठं पिंप मोठ्या आढ्यतेनं उभं होतं. इं-शो बेडकाने पिंप बघताच त्याच्यावर झेपच घेतली. इं-शो बेडकाचा उसळता आत्मविश्वास पाहून बारनूनं त्वरेनं पिंपाचं झाकण उघडलं. आता इंधन प्यायचं नी लगेच वाटेला लागायचं असा सुखद विचार बारनूच्या मनात घोळू लागला. चालकाच्या पोटात पुरेसं इंधन असेल तर तबकडी वाट्टेल तितकी उडू शके. पण पिंपाच्या आत डोकावताच बारनूला मोठा धक्काच बसला. आतलं द्रव इंधन नव्हतंच! ते होतं सोनेरी केशरी मावळत्या ताऱ्याच्या रंगाचं मिश्रण. बारनू गोंधळून काय करावं याच्या विचारात पडला इतक्यात त्याच्या मागून जोराचा कोलाहल ऐकू येऊ लागला आणि तो आवाज क्षणोक्षणी वाढू लागला. बारनूच्या जिवाचा एकदम थरकाप उडाला. कानोसा देऊन ऐकल्यावर बारनूची खात्री पटली की येणारा प्राणी आकारानी भयंकर मोठा आणि अनेक पाय असलेला किडा असावा. त्याच्या पायांचा फतॅक फतॅक आवाज अगदी जवळ येऊन ठेपला आणि बारनूनं पुढचा मागचा विचार न करता पिंपातला द्रवपदार्थ गटागट पिऊन टाकला. आणि लगेचच तबकडीच्या दिशेनं पलायन केलं. पाठोपाठ इं-शो बेडकानी चपळाईने तबकडीत उडी मारली आणि दार बंद झालं.
इं-शो बेडकाचं इंधनाविषयीचं म्हणनं बरोबर असावं कारण तबकडी थडथडू लागली आणि परत उडती होऊन अंमळ जास्तच वेगानी अवकाश कापू लागली.

ब)

तीन ते पाच वयोगटातल्या मुलांचे घोळकेच्या घोळके शाळेच्या हॉल मधे शिरले. एकमेकांबरोबर मस्ती करत, किंचाळत असलेली मुलं टेबलावरच्या खाऊच्या दिशेनी झेपावली. वार्षिक संमेलनाच्या कार्यक्रमात नाचून गाऊन आलेली मुलं तहानली-भुकेजली होती. पण आधी कोण नंतर कोण च्या गडबडीत सरबताचा पिंप धडक बसून उपडा पडला! क्षणभर सगळे स्तब्ध झाले. सगळ्यात छोटी मुलं सरबत वाहून गेलं या कल्पनेनी रडं पसरायला लागली. पण पिंपातून काहीच वाहून गेलं नाही कारण पिंप खडखडीत रिकामं होतं!
शेवटी साईनाथ बालक मंदीराच्या मुलांना केक्स आणि वेफर्स वरच भागवावं लागलं कारण ऑरेंज सरबत कुठे गायब झालं हे कोणाला कधीच कळलं नाही.

Posted by: Nivedita Barve | एप्रिल 20, 2009

“उंदरा, कुठंयस तू?!”

arbits_kacha_kavadya_23दुपारच्या वेळी जेव्हा सर्व मांजरं आपापल्या घरात राहणं पसंत करतात त्यावेळी काळ्या-हिरव्या मांजराला तसंच केल्यामुळे एकटेपणाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळेच की काय त्याला त्याच्या एका जुन्या सवंगड्याची आठवण झाली. आठवण झाल्यासरशी त्याला भेटणं अपरिहार्यच होतं… पण तो होता तरी कुठं? मांजराला शेवटचं त्याला सोफ्याखाली पाहिल्याचं आठवलं पण आता तो तिथं नव्हता हे पाहून मांजराला आश्चर्यच वाटलं, “तो कधीच एकटा कुठं पळून जात नाही… कधीही त्रास देत नाही, तो दुसऱ्या उंदरांसारखा नाहीच खरंतर… दिसतो पण कसा गोरा गोरा आणि त्याच्या कापडी पोटानी नाकाला कसल्या गुदगुल्या होतात…हीही ..हीही…” मांजराला आठवूनच हसायला यायला लागलं.
मांजराचा दंगा ऐकून बेबलॉश्कीनी आठ्या पाडून त्याच्याकडे पाहिलं. मांजराला आता पहिल्यांदाच बेबलॉश्कीबद्दल शंका वाटू लागली “बेबलॉश्कीनी तर कापडी उंदराला खेळायला नेलं नसेल???!!” लगेच मांजर बेबलॉश्कीच्या खोलीत गेलं आणि तिथलं दृश्य बघून क्षणभर भयचकीत होऊन उभं राहिलं. एका उंच दोरीवर कापडी उंदराला चिकटवलं होतं आणि त्याच्या शेपटीतून पाणी ठिपकत होतं! अर्थ उघड होता, मांजराचा संशय बरोबर होता, बेबलॉश्कीनीच उंदराला इतक्या उंच चिकटवलं होतं! आता कुठच्याही परिस्थीतीत उंदराला सोडवायलाच हवं होतं. मांजरानी जिवाच्या आकांतानी उड्या मारायला सुरूवात केली.
शेवटी मांजराच्या प्रयत्नांना जेव्हा यश आलं आणि उंदीर त्याच्या हाती आला तेव्हा तो आश्चर्यकारकरीत्या जास्त गोरा आणि मऊ झाल्याचं त्याला जाणवलं!

ilus_22_dark_sky2कुठल्याशा विचारात गढून गेलेला बेबलॉश्की आकाशातल्या अंधाराच्या पार नजर लावून बसला होता. गच्चीत आडवा पडला असल्यामुळे त्याला फक्त ठिपकाळलेलं काळं आभाळ आणि त्या बॅकग्राऊंडवर कठड्यावर बसलेलं मांजर तेव्हढं दिसत होतं. मधूनच आकाशाचा काळा गालीचा अंगावर उतरतोय की काय असा त्याला भास होत होता. त्याच्या मनात आलं “कसला भन्नाट प्रकार आहे हा! मी असा आत्ता या आकाशाकडे बघतोय पण हे आकाश काही खरं नाहिये! म्हणजे तारे, ग्रह, ब्लॅक-होल्स इत्यादी वजा करून उरतं ते अभाळ, म्हणजे नसलेलं काहीतरी! नसलेल्या केव्हढ्यातरी मोठ्या कशाकडेतरी मी बघतोय!” हा मजेदार विचार मनात आल्यामुळे बेबलॉश्कीला मस्त वाटू लगलं. तो नकळतच गाणं गुणगुणु लागला. पण ते गाणं मांजराचं विशेष नावडतं होतं! मांजर रागानी फिस्कारलं आणि कठद्यावरच्या अढळ जागेवरून चटकन उडी मारून लांब कोपऱ्यात जाऊन बसलं.
अंधारातल्या कठड्यावरची ती जागा एकदम रिकामी झाली. बेबलॉश्कीला वाटलं “आत्ता मांजर जिथे होतं तिथे ते आत्ता नाही, मी पण आत्ता इथे आहे पण मग पृथ्वी हलेल आणि तिच्याबरोबर मीही इथून हलेन. पण मला दिसणारं आणि खरं म्हणजे नसणारं हे काळंभोर आकाश कुठे-कुठेच हलणार नाही!”
बेबलॉश्कीला या निश्कर्षाने किंचित गरगरल्यासारखं झालं. मांजर मात्र तोपर्यंत अंगाचं मुटकुळं करून कोपऱ्यात गाढ झोपी गेलं होतं!

ilus-21-neena1अनेक लोकांनी दार वाजवलं त्या दिवशी! काहींना कसल्या कसल्या बिलांचे पैसे हवे होते तर काहींना काय काय गोष्टी बेबलॉश्कीला स्वस्तात विकायच्या होत्या. पण बेबलॉश्की तरी काय करू शकणार होता? सहा वर्षं पुरतील इतक्या टीकाऊ साबणाच्या वड्या किंवा लहान मुलांच्या गंमत गाणी-गोष्टींचा संच त्याच्या काहीच उपयोगाचा नव्हता. बेबलॉश्कीला वाटलं अशा परीस्थीतीत नेहमीच होतं त्याप्रमाणे त्याला खूप वाट बघायला लागणार आहे. “जेव्हा एखादी गोष्ट पटकन घडावी असं वाटतं तेव्हा ती नेहमीच घडायला उशीर लावते आणि कधी-कधी तर ती घडतच नाही असंही होतं…” प्रत्येक विचरासरशी बेबलॉश्की अजूनच उदास होत होता.
बेबलॉश्कीची परिस्थिती अजून किती तरी बिकट होऊ शकली असती पण तसं व्हायच्या आधीच नीना घरात अवतरली!
बेबलॉश्कीने आनंदाने उडीच मारली, “जग खूप सुंदर आहे, नेहमीच इथे चांगल्या गोष्टी घडतात आणि चांगल्या लोकांच्या बाबतीत तर हमखासच…” असं काहीबाही बेबलॉश्कीच्या मनात तरळू लागलं!
“बेबलॉश्की! कित्ती गोड दिसतोय तुला हा शर्ट! ए तुझं मांजर कित्ती गोड आहे रे! ये शोनुल्या माझ्याजवळ, गुंडाच तो कित्ती गोड गोड आहेश तू!”
काळं-हिरवं मांजर चढाई करून येणाऱ्या मुलीला बघून बावचळून गेलं. “या मुलीजवळ जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही!” मांजर जोरानी ओरडलं. बेबलॉश्की खूपसे हातवारे करून मांजराला सभ्य वागण्याची विनवणी करू लागला. पण मांजराचा आवेश बघता आता ते काय करणार आहे या विचाराने त्याने भयंकर घाबरून पाहिलं तर मांजर त्याच क्षणी खिडकीतून उडी मारावी की या मुलीला बोचकारावं या ऑप्शन्स चा विचार करत होतं. अचानक एक वेगळाच प्रकार घडला, नीनानी पर्समधून एक छानदार कपकेक काढला आणि मांजरासमोर धरला. दुसऱ्याच क्षणी मांजर नीनाच्या मांडीवर बसून मजेत केक खाऊ लागलं आणि बेबलॉश्कीचा जीव भांड्यात पडला!
पण त्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला “नीनाला मांजर फारच आवडलंय, आता नीना फक्त मांजराबरोबरच खेळत बसेल की काय? कदाचीत ती फक्त मांजरालाच भेटायला येइल इथून पुढे, किंवा मांजराला बाहेरच्या बाहेरच भेटून निघून जाईल!” बेबलॉश्कीचा जीव एकदम कासावीस व्हायला लागला.
तोच एक वेगळाच प्रकार घडला, नीनानी पर्समधून एक भलंमोठं खोकं काढलं. बेबलॉश्कीनं विचारलं “काय आहे हे?”
“१००० तुकड्यांचं मोट्ठं जिग-सॉ पझल! जेवता जेवता खेळूया?”

Posted by: Nivedita Barve | फेब्रुवारी 24, 2009

म्याऊ म्याऊ बशीभर खाऊ

ilus-20-neena3शनिवारची सकाळ होती आणि बेबलॉश्की मुळीच अंघोळीला जायला तयार नव्ह्ता. मांजराने मात्र उठल्या उठल्या अंग चाटून टाकलं होतं आणि ते खाणं मिळण्याची वाट पहात बसलं होतं. बेबलॉश्कीकडे त्याने रागावलेल्या डोळ्यांनी पाहून झालं होतं पण बेबलॉश्की काही बधत नव्हता. शेजारच्या काकू जेव्हा त्याच्यासाठी वाटीभर पोहे घेऊन आल्या तेव्हा त्यांनीसुद्धा बऱ्याच नापसंतीने त्याच्याकडे पाहिलं होतं. त्यानंतरही तासभर बेबलॉश्की पोहे खात टीव्ही समोर बसून राहिला. मांजराला असं वाटलं की आज बेबलॉश्की रात्र होइपर्यन्त काही हलणार नाही आणि त्याला काही खायला देणार नाही. मग मांजर खिडकीबाहेर उडी टाकून खाण्याच्या शोधात निघून गेलं.
तासाभराने जेव्हा मांजर आलं तेव्हा बेबलॉश्की इंचभरही हलला नव्हता. मांजराला फक्त एक बारीकसा उंदीरच काय तो मिळाला असल्यामुळे ते उदास होऊन विचार करू लागलं, “आता बेबलॉश्की असं किती दिवस करणार कोणास ठाउक, हे असं आठवडाभर जरी चाललं तर गल्लीतले सगळे उंदीर संपून जातील मग खायचं तरी काय? आणि बेबलॉश्की तरी काय खाईल? शेजारच्या बाई काही नेहमी नेहमी खाण्याची वाटी देत नाहीत काही…”
मांजराच्या विचार-साखळीला थांबवत फोनची घंटा वाजली. बेबलॉश्कीनी नाखुशीनेच फोन उचलला आणि मिनीटभर उत्साहाने बोलत राहीला “हो हो ये ना, मी तयारच आहे.. हो घरीच डिनर करू, एव्हढा स्वयंपाक येतो की मला!”
अचानक अर्धा तास घरात मग तुंबळ युद्धंच झालं, बेबलॉश्कीची आंघोळ, घरातला कचरा, धुण्याचे कपडे, पुस्तकांची लावालावी, किचन मधली साफसफाई धुमधडाक्यात पूर्ण झाली. मांजर हे सगळं बघून चक्रावूनच गेलं पण आता आपल्याला खायला मिळेल अशी बारीक आशा ही त्याला वाटायला लागली. त्याच्या मनातलं ओळखल्याप्रमाणे बेबलॉश्की खाण्याची बशी घेऊन मांजरापुढे बसला “हां खाऊन घे आत्ताच, नंतर त्रास नको काही, आज नीना येणार आहे इकडे!”
मांजराने या बडबडीकडे अर्थातच दुर्लक्ष केलं आणि बशीवर हल्ला केला. जेव्हा दाराची बेल वाजली आणि बेबलॉश्की टुणकन उठून दार उघडायला गेला तेव्हा घराप्रमाणेच मांजराची बशी देखील स्वच्छ झाली होती.

Older Posts »

प्रवर्ग