Posted by: Nivedita Barve | जानेवारी 11, 2009

बेचव काळ्या भुंग्याची गोष्ट

ilus-19-chopperबाहेर ऊन रणरणत होतं आणि काळं-हिरवं मांजर ध्यानस्थ बसलं होतं. बेबलॉश्की कोपऱ्यात कुठल्याशा काळ्या डब्याशी चाळा करत बसला होता. अशा शांत वातावरणात नेहमीच होतं त्या प्रमाणे एक वादळ “गुण-गुण” करत मांजराच्या नाकाभोवती घोंघावू लागलं. मांजराने चमकून डोळे उघडले तर एक मोठ्ठा भुंगा त्याच्या समोर आला. मांजराने तत्परतेने भुंग्याला एक सणसणीत पंजा मारला पण भुंगा बचावला आणि त्वेषाने गुण-गुणु लागला. त्यात भर म्हणून बेबलॉश्की मोठ-मोठ्याने ही-ही करत हसायला लागला. हे पाहून मांजर इरेला पेटलं आणि त्यानं भुंग्याला पंजा मार, त्याच्यावर उडी मार असं काहीबाही करण्याचा सपाटाच लावला. मग थोडा वेळ खूपच गोंधळाचं वातावरण तयार झालं. भुंगा मांजराला न जुमानता ऐटीत उंडारत होता त्यात बेबलॉश्कीने जोरजोरात काळा डब्बा उडवत त्या दोघांभोवती विचित्र आदिवासी नाच करायला सुरूवात केली. मांजर मग जास्तच चेकाळलं आणि त्यानी भुंग्यावर एक जोरदार हल्ला चढवला. भुंगा भेलकांडत खाली येऊन पडला आणि मांजराने त्वरित झडप घालून त्याला तोंडात कोंबलं. पण दुसऱ्याच क्षणी त्यानी भुंग्याला बाहेर ओकून टाकलं कारण भुंगा भलताच बेचव आणि कडक हाडांचा होता! बेबलॉश्की ने लगेच भुंग्याकडे धाव घेतली आणि कसंबसं त्याला त्याच्या पायांवर उभं केलं. बेबलॉश्कीनी भुंग्याला उडण्यासाठी खूप विनवण्या केल्या पण भुंगा जागचा हललाच नाही. मग बेबलॉश्की वेड्यासारखा हातातल्या काळ्या डब्ब्यावर खूप वेळ हात मारत राहिला, पण भुंगा तटस्थपणे आकाशाकडे डोळे लावून शुन्यात बघत राहिला.
मांजराला उगाचाच कसंनुसं वाटलं आणि एक उसासा टाकून ते परत ध्यानस्थ झालं.

Advertisements
Posted by: Nivedita Barve | ऑक्टोबर 28, 2008

त्याच्या व्ह्यू-फाईंडर मधले कळप

बेबलॉश्कीने त्या दिवशी कॅमेऱ्याचे लेन्सेस स्वच्छ केले आणि मेमरी रिकामी केली. मग सायकलवर टांग मारून बेबलॉश्की आणि पुढच्या बास्केट मधे मांजर असे दोघं गावाबाहेर भटकंतीला निघाले. चाकाखालचा रस्ता संपला आणि पायवाट लागली तेव्हा बेबलॉश्कीने एक छानदार झाड पाहून सायकल लावून टाकली. नुकताच पाउस पडून गेल्यामुळे सगळीकडे सुंदर हिरवळ होती. बेबलॉश्की मजेत शीळ मारत कुरणातून फिरू लागला आणि मांजर खुशीत आलं. तिथे मेंढ्यांचा एक मोठा कळप दोन मेंढपाळांना घेऊन आला होता. बेबलॉश्कीने मेंढपाळांशी गप्पा मारल्या, नावा-गावाची चौकशी केली आणि मेंढ्यांचे फोटो काढले तर चालतील का असं विचारलं. मेंढपाळ स्वभावाने चांगला होता, तो म्हणाला हवे तितके फोटो काढा. बेबलॉश्कीने कळपाचे, मेंढीच्या पिल्लाचे, मेंढ्यांबरोबर मांजराचे असे अनेक कलात्मक फोटो काढले. फोटो छान आले आणि तो विचार करू लागला “हे  फोटो वर्तमानपत्राच्या निसर्गावरच्या पुरवणीसाठी द्यावेत, कुणी सांगावं कदाचित नॅशनल जिओग्राफिक सारख्या मॅगझीनलाही आवडतील हे फोटो! पुढे कधी अंतर्राष्ट्रीय प्रदर्शनही भरवता ये ईल…” बेबलॉश्कीचा उत्साह आणि विचारांचा प्रवाह ओसंडून जात होता…तेव्हढ्यात मेंढपाळ कौतुकाने म्हणाला “चांगला छंद आहे तुमचा, काही काही लोकांना आवडतं प्राण्यांचे फोटो काढायला तर काही लोकांना बघायलाही नाही आवडत असे फोटो!” बेबलॉश्की हे ऐकुन एकदम चमकला, प्राण्यांचे फोटो बघायलाही न आवडणारे अनेक लोक त्याला माहीत होते. बेबलॉश्की खिन्न हो ऊन परत निघाला. त्यावेळी काळं हिरवं मांजर एका बऱ्यापैकी मोठ्या मेंढीला घाबरवण्याच्या प्रयत्नात होतं, ते अनिच्छेनेच बेबलॉश्कीबरोबर निघालं.
परतीच्या सुंदर हिरव्या गार वाटेवर वाऱ्याच्या झुळूकी अंगावर घेत बेबलॉश्की प्राण्यांचे फोटो आवडणाऱ्या लोकांचा विचार करू लागला!

Posted by: Nivedita Barve | सप्टेंबर 22, 2008

दूर कुठेतरी हिरव्या रानात…

गेले काही दिवस बेबलॉश्कीला खूपच जास्त काम पडलं होतं. काम एकदम महत्त्वाचं होतं, ऑफिसमधल्या सर्व वरिष्ठांच त्यावर लक्ष होतं. शेवटी जेव्हा सर्व गोष्टी करून संपल्या तेव्हा बेबलॉश्की आतुरतेनी वरिष्ठांच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला. पुढचे काही दिवस काहीच कळलं नाही तेव्हा त्याला थोडसं अस्वस्थ वाटू लागलं आणि पुढच्या चार दिवसांनी त्याला टेन्शनच आलं. त्याला असं महत्त्वाच्या घडामोडींच्या मधे असणं कससंच वाटू लागलं होतं. शेवटी त्याने विचार केला “बहुतेक कामाचा ताण पडतोय जास्त, कुठंतरी निवांत भटकायला गेलं पाहिजे, काळं-हिरवं मांजर पण कंटाळलंय. एखाद्या हिरव्यागार झाडांच्या सानिद्ध्यातल्या काळ्या मातीच्या प्रदेशात जावं. मांजराला छान वाटेल तिथं, कॅमोफ्लाज झाल्यासारखं. कधी-कधी आपल्याला कोणी वेगळं काढून ओळखत नाही हे सुखावणारं असतं!”
दोन आठवड्यांनी कंपनीला मोठा फायदा झाल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना कौतुकाची इ-मेल पाठवण्यात आली. बेबलॉश्की त्या रविवारी मांजराबरोबर जवळच्या एका गडावर फिरायला गेला. तिथल्या गर्द वनराईत झाडाच्या सावलीत त्याला गाढ झोप लागली. कोणीही त्याला डिस्टर्ब केलं नाही आणि मांजर मनमोकळेपणानं उंडारत राहिलं.

Posted by: Nivedita Barve | ऑगस्ट 4, 2008

इथलं आणि तिथलं… किंवा कुठलंही

बेबलॉश्की दुपारचा फळं खात बसला होता, त्याच्या आवडीचं सिताफळ आणि ज्याच्या विषयी त्याचं फार काही मत नव्हतं असं सफरचंद. चाळा म्हणून तो विचार करू लागला, “हे सफरचंद कुठून आलं असेल, आणि हे सिताफळ?” तो राहतो त्या जवळच्याच जिल्ह्यात मुबलक सिताफळं पिकतात हे त्याला ठाऊक होतं. दुसऱ्या देशांमधे सिताफळं मिळत असतील का? असा प्रश्न त्याला पडला आणि मिळत नसतील तर तिथल्या लोकांविषयी त्याला हळहळही वाटली. दुसऱ्याच क्षणी सफरचंद ‘New Zealand’ मधून आलंय याची त्याला खात्री पटली, कारण त्यावर तसं लेबलच चिकटवलेलं होतं. मग त्याला एक भन्नाट कल्पना सुचली, त्यानं सफरचंदाचं लेबल काढून अलगदपणे सिताफळावर लावलं.मग खूष होत त्यानं New Zealand चं सिताफळ मटकवायला सुरुवात केली आणि थोडसं काळ्या-हिरव्या मांजरालाही देऊ केलं. पण New Zealand च काय, कुठल्याच देशातलं सिताफळ मांजराला आवडत नसल्यामुळे बेबलॉश्कीकडे एक तिरस्कारपूर्ण कटाक्ष टाकून ते तिथून पसार झालं!

काळं-हिरवं मांजर चिडचिडलं होतं. आख्खं घर पालथं घालून झालं तरी त्याला त्याचं झोपायचं खोकं सापडलं नव्हतं आणि त्यात भरीस भर म्हाणजे त्याला आता खूप झोपही यायला लागली होती. मांजराचा मुळातला प्लॅन तसा साधाच होता, नेहमीच्या ठिकाणी जाऊन खोक्यात ताणून देणे! पण आजचा दिवस वेगळा होता, खोकं नेहमीच्या जागी नव्हतंच. आधी मांजराचा विश्वास बसेना पण मग घटनेचं गांभीर्य ओळखून त्यानी आजु-बाजूची ठिकाणं धुंडाळायला सुरुवात केली. मग इतर खोल्या शोधल्या आणि शेवटी बागेतही जेव्हा खोकं सापडलं नाही तेव्हा मांजर हताश झालं, झोपही दाटून आल्यामुळे त्याच्या नकळतच त्याची पावलं नेहमीच्या ठिकाणी वळली. खोकं अर्थातच नव्हतं.
बेबलॉश्की मांजराची सगळी धावपळ पाहत होता. त्याला खरंतर कळतच नव्हतं की मांजराला काय हवंय ते, पण जेव्हा मांजर भटकून परत आलं तेव्हा बेबलॉश्कीला उमगलं की मांजराला झोप आली आहे. मग बेबलॉश्कीने मांजराला उचलून घेतलं, त्याला लाडाने कुरवाळलं, मांजराला हे attention खूप छान वाटलं पण त्याच वेळी एक नवाच विजेसारखा विचार त्याच्या मनात लखलखला “… कदाचित खोकं हरवण्याच्या मागे बेबलॉश्कीच असावा, पण बेबलॉश्कीला त्यातून काय साद्ध्य होणार आहे? पण बेबलॉश्कीच्या बऱ्याच गोष्टींना तसा अर्थ नसतोच बरेचदा, तसंच असावं हे…” मांजराचे विचार चालू असतानाच बेबलॉश्कीने त्याला छानपैकी जुन्या खोक्याच्या जागी ठेवलेल्या नवीन बास्केट मधल्या मऊ गादीवर झोपवलं..

Posted by: Nivedita Barve | मे 25, 2008

गोल-गोल तरंग

ती आर्ट गॅलरी एक मस्त गोल प्रकरण होती. तिच्या मध्यावर एक गोल जिना होता, त्या चार मजल्यांना जोडणारा. प्रत्येक मजल्यावर भारी भारी मजेच्या गोष्टी ठेवल्या होत्या… उदाहरणार्थ पहिल्या मजल्यावर एक प्रवाशाची ट्रंक होती आणि त्यात निळं निळं आभाळ भरलेलं होतं. दुसऱ्या मजल्यावर कोपऱ्यात खूप वाद्यं ठेवलेली होती. बटन दाबताच ती स्वत:च वाजत होती. मग काही बोर्डांवर जुन्या जाहिराती आणि कात्रणं होती तर काही क्लिष्ट गणिती प्रमेयं गंभीर डिझाईन्स बनवत होती.
अशा या अनेक मजले-मजलेभर पसरलेल्या गोष्टी कशासाठी होत्या किंवा त्यांचा काय उपयोग होता हे कळणं अवघडच होतं. त्यामुळेच बहुतेक गॅलरी तशी रिकामीच होती आणि सगळ्या गोष्टी शांततेच्या जड वेष्टनात गुंडाळल्यासारख्या होत्या.
अचानक तरंग उठावेत तशी टक-टक-टक-टक चार छोटी टाळकी गॅलरीत आली. विस्फारलेल्या नजरांनी त्यांनी आकाशाची पेटी वाकून वाकून पाहिली तर बुद्धीबळाच्या आठ भलत्या-भलत्याच आकाराच्या पटांवर ते खूपच खूष झाले. टीवी चे संच, विचित्र चित्रं, डब्या, खेळणी असं बघत बघत मंडळी चौथ्या मजल्यावर पोचली आणि तिथून तळमजल्याच्या मध्यावर ठेवलेल्या पियानोकडे बघायला लागली. वरून डोकावणारी चार टाळकी जणू त्या शांततेच्या fluid मधे उचंबळणारे तरंगच वाटत होती.

Posted by: Nivedita Barve | एप्रिल 12, 2008

त्याच्या चौकटीतला लयदार प्रदेश

बेबलॉश्कीच्या कपड्यांचा पसारा भलतीकडेच पसरला होता तर काळ्या-हिरव्या मांजराचं झोपण्याचं खोकं उलटीकडे पडलं होतं. खिडकीबाहेरच्या गुलमोहोराची पानं वाऱ्याने हलत होती आणि बेबलॉश्कीचं इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असं अधुन-मधून चालंलं होतं. आरशातल्या चौकटीतून काळं-हिरवं मांजर या सगळ्या गोष्टी आणि हालचालींकडे पाहत बसलं होतं. का कोणास ठाऊक काही वेळानी त्याला चौकटीत एक विचित्र लय जाणवू लागली. पुस्तकांचे ढिगारे तलम सुळसुळीत होऊन खुर्चीच्या हातावर पडले आणि झोपण्याच्या खोक्याचं सरळ रेषांचं त्रिमितीय रूप तर फारच आकर्षक भासू लागलं. आणि बेबलॉश्की तर अजिबातच कंटाळवाणा वाटत नव्हता… त्याचं वावरणं झोक्यांच्या लयीत घडत असल्यासारखं वाटत होतं. अचानक बेबलॉश्की मोठा मोठा मोठा होऊ लागला आणि मांजराला वाटू लागलं तो आता चौकटीतून बाहेरच येणार आहे, तोच बेबलॉश्कीच्या हातात मांजराला स्वत:चं काळं-हिरवं रुपडं दिसू लागलं. मग मांजराला झोक्यांच्या लयीमुळे किंचित भोवळल्यासारखं झालं.

कित्येक दिवस खूप साहित्यिकांच्या खूप थोर कलाकृती वाचून झाल्यावर बेबलॉश्कीला वाटले आपणही काहीतरी लिहावे. त्याने एक नवी कोरी रेघारेघांची वही आणली आणि एका नव्या कोऱ्या काळ्या पेनाने लिहायचे ठरवले. पण आता काय लिहावे हा प्रश्न निर्माण झाला. मग डोक्यात जो पहिला विचार आला त्यावर त्याने लिहायला सुरुवात केली तर त्याला दोन ओळींतच लक्षात आलं की एका साहित्यिकाने त्यावर आठ खंड आधीच लिहून ठेवले आहेत. मग दुसऱ्या नंबरच्या विचारावरचा त्याला हायकू संग्रह आठवला. तिसऱ्या आणि चौथ्या विषयाचीही अशीच अनुक्रमे एका ब्लॉग आणि दिर्घांकामध्ये वासलात लागल्यावर बेबलॉश्कीला एकदम कोंडीत सापडल्यासारखं वाटू लागलं. त्यात त्याला वहीची पानंही उष्टी झाल्यासारखी वाटू लागली. तो मग भयंकर अस्वस्थ झाला आणि त्यानं पटकन वहीची लिहिलेली पानं फाडून टाकली.
वही spiral binding ची असल्यामुळे पुन्हा नवी कोरी दिसू लागली. त्या शुभ्र पानांकडे बघता बघताच बेबलॉश्कीच्या मनात विचार आला “या कोऱ्या पानासारखाच माझा हा प्रयत्न नवा कोरा आहे, कदाचित आधी कोणी कोणी महान लोकांनी सर्व विचारांवर लिहून ठेवलेलं असेलही, पण माझे विचार तर माझ्या आयुष्यावरचेच तर आहेत ना!! कदाचित माझं लेखन कोणाला खूप थोर वाटणारही नाही पण माझ्या आयुष्यावरचे माझे विचार तर फक्त मीच लिहू शकतो!!” बेबलॉश्कीला आता डोक्यातल्या सर्वच्या सर्व गोष्टी लिहून काढायची तीव्र निकड भासू लागली.
मग सुरुवातीच्या आखीव-रेखीव हस्ताक्षराचं अखर-वखर शब्दांत रुपांतर होईपर्यंत तो लिहितच राहिला.

Posted by: Nivedita Barve | मार्च 2, 2008

ती गेली तेव्हा

त्या एका सुरेख दिवशी, काळ्या हिरव्या मांजराला खूपच कंटाळा आला होता. काय कारण होतं कोणास ठाऊक पण त्याला नेहमीसारखं काहीच वाटत नव्हतं. नेहमीसारखं म्हणजे उनाडावं, झोपावं, आळसावं या प्रकारचं काहीच त्याला वाटेना. थोडं त्राग्यानीच ते दारातून बाहेर पडलं आणि निरुद्देश चालू लागलं. त्याला पाहताच शेजारच्या जाड़्या कुत्र्यानी जोर जोरात भुंकायला सुरुवात केली, पण मांजराला आज socialization चा मूड नव्हता, त्यानी जाड्या कुत्र्याकडे दुर्लक्ष केलं. कुत्रा तरीही नेटाने भुंकत राहिला. गल्लीला चार फेऱ्या मारून झाल्या, कचराकुंडीत नाक घालून झालं, कोपऱ्यावरच्या बंगल्यात उडी मारून झाली तरीही मांजराला छान वाटेना. मग ते गुलमोहोरावरच्या एका विविक्षीत फांदीवर चढून बसलं. ती त्याची आवडती जागा होती, तिथून त्याला त्याचं घर आणि ओळखीची इतर चार दोन घरं दिसायची. आताही बेबलॉश्की कुंपणावरून पलीकडच्या घरातल्या बाईंशी बोलताना दिसत होता. मांजराला वाटलं “बेबलॉश्की किती बडबड करतो..नेहमीच…त्यातली अर्धी बडबड तर निरर्थकच असते..जेव्हा तो खाऊ देतो तेव्हाच काय तो त्याच्या बोलण्याला अर्थ असतो, एरवी नुसतेच वेगवेगळे आवाज करत बसतो..आत्ता ज्यांच्याशी बोलतोय त्या बाईही अशाच… पण त्यांची मांजर व्यवस्थीत बोलते..सगळं समजतं तिचं बोलणं..पण कालपासून तीही नसणारच आहे आता..तिला आचरटासारखं माणसं बघायला जायचं होतं म्हणे…Cat show ला..कित्ती कंटाळवाणं आहे सगळं!”
मांजराला गुलमोहोरावरच्या आवडत्या जागीही मजा वाटेना, त्यानं खाली उडी मारली आणि परत गल्लीच्या फेर्या आणि फाटकांवरच्या उड्या सुरू केल्या.

Posted by: Nivedita Barve | फेब्रुवारी 13, 2008

झोप

सकाळचे साडेआठ वाजले होते आणि छोटा पिकू गाढ झोपेत होता. पिकूची आई त्याला उठवायला आली “पिकू उठ रे बाळा, सूर्य केवढा वर आलाय बघ!” पिकू ढिम्म हलला नाही कारण त्याला काही ऐकूच गेलं नाही. तेवढ्यात पिकूचे बाबा म्हणाले, “झोपू दे गं त्याला, थंडीचे दिवस आहेत..आणि आज नाहीतरी सुट्टीच आहे त्याला.” आईला असं बेशिस्त वागणं आवडलं नाही पण ती काही म्हणाली नाही.
मग असेच जेव्हा दहा वाजले आणि तरीही पिकू उठायचं नाव काढेना तेव्हा बाबांनीच त्याला बळंबळं उठवलं. पिकू कष्टानेच उठला, त्याला हे सगळं प्रकरण बिलकूलच आवडलं नाही. त्याला खरंतर अजून खूप झोपायचं होतं. त्याला बाईंनी शाळेत शिकवलेल्या काय काय गोष्टी आठवू लागल्या की खारूताईंसारखे प्राणी थंडीचे सर्व दिवस झोपून काढतात… पिकूनी मग जोरात भोकाड पसरलं.

« Newer Posts - Older Posts »

प्रवर्ग