आजचा दिवस काही बेबलॉश्कीसाठी बरा दिसत नव्हता. त्यानी सकाळी कॉफीत साखरेऐवजी मीठ घातलं, मग नीनाच्या ऐवजी भलत्याच कुणालातरी फोन लावला. हे सगळं कमी की काय म्हणून त्याने धुतलेलेच कपडे परत धुवून काढले! आपण खूप वेंधळ्यासारखं वागतोय हे त्याच्या लक्षात आलंच दुपारपर्यंत. मग त्याला फार ओशाळवाणं वाटायला लागलं.
तसं बघायला गेलं तर असे प्रसंग बेबलॉश्कीच्या आयुष्यात वरचेवर घडत, तो एकटा असतानाच नाही तर चांगल्या चार-दोन लोकांच्या साक्षीने घडत. एकदा जेवताना शर्टावर दही सांडलं आणि सगळे हसले तर एकदा तो वेगवेगळे सॉक्स घालून ऑफीसमधे गेला आणि सगळ्यांच्या ते लक्षात आलं. वाढदिवस विसरणं ठीक, पण बऱ्याचदा बेबलॉश्की वाढदिवस नसताना मित्र-मैत्रिणींना छानसं बर्थडे ग्रीटिंगकार्ड देत असे. खरंतर बेबलॉश्की आता चांगला मोठा झाला होता, असे प्रसंग त्याने निर्माणच होऊ द्यायला नको होते आणि असं काही झालंच तर ते किमान मनाला तरी लावून घ्यायला नको होतं. पण यातली कुठचीच गोष्ट त्याच्याचाने होत नव्हती. त्याला तर जुन्या गोष्टी नुसत्या आठवल्या तरी लाजल्यासारखं व्हायचं. मग असे नकोसे विचार डोक्यात नाचायला लागले की नकळतच तो एक गाणं गुणगुणायला लागायचा.
“निळ्या पाण्यात निळी शाई
मला काही आठवत नाही!
मला काहीच आठवत नाही!”
आताही तो हे गाणं बऱ्याच मोठ्या आवाजात गायला लागला होता.
काळ्या-हिरव्या मांजराला हा प्रकार बिलकुलच आवडला नाही. पण बेबलॉश्कीच्या या आचरट वागण्याचं काय करावं हे त्याला काही कळेना. शेवटी एक उसासा टाकून ते स्वत:शीच म्हणालं, “असा भेसूर आवाज काढल्याबद्दल बेबलॉश्कीला स्वत:बद्दल खूपच ओशाळवाणं वाटायला पाहिजे खरंतर!”.


उडती तबकडी कशीबशी हेलपांडत भिंतीच्या मागच्या बाजूला उतरली. लगेचच तबकडीचं दार उघडलं आणि बारनू बाहेर पडला. उतरताच त्यानं इकडे-तिकडे बिलकुल न बघता नाकासमोर चालायला सुरूवात केली. तसं करणं खरंतर फारसं सोयीचं नव्हतं कारण नाकासमोर एक सरळसोट भिंत उभी होती! पण बारनू तरी काय करणार होता बिचारा? एकतर त्याच्या तबकडीनं गपगार व्हायला जी जागा निवडली होती ती त्याच्या नकाशात नोंदलेलीच नव्हती आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे अशी काही ठिकाणं ब्रह्मांडात अस्तित्वात आहेत हेच त्याला माहीत नव्हतं. मग अशावेळी त्याच्या ग्रहावर प्रसिद्ध असलेली एक म्हणच त्याच्या उपयोगी आली “अनोळखी ग्रहावर नाकासमोर चाला आणि इकडे-तिकडे ढुंकुनही पाहू नका.” पण याच म्हणीमुळे खरंतर बारनूचा भिंतीवर आपटून आता कपाळमोक्षच होणार होता इतक्यात “ड्रक ड्रक ड्रॅव ड्रॅव” असा संकेत देत इंधन-शोधक बेडुक उसळ्या मारू लागला. इं-शो बेडकाकडे दचकून बघत बारनू त्यानी दर्शवलेल्या दिशेला गेला.
दुपारच्या वेळी जेव्हा सर्व मांजरं आपापल्या घरात राहणं पसंत करतात त्यावेळी काळ्या-हिरव्या मांजराला तसंच केल्यामुळे एकटेपणाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळेच की काय त्याला त्याच्या एका जुन्या सवंगड्याची आठवण झाली. आठवण झाल्यासरशी त्याला भेटणं अपरिहार्यच होतं… पण तो होता तरी कुठं? मांजराला शेवटचं त्याला सोफ्याखाली पाहिल्याचं आठवलं पण आता तो तिथं नव्हता हे पाहून मांजराला आश्चर्यच वाटलं, “तो कधीच एकटा कुठं पळून जात नाही… कधीही त्रास देत नाही, तो दुसऱ्या उंदरांसारखा नाहीच खरंतर… दिसतो पण कसा गोरा गोरा आणि त्याच्या कापडी पोटानी नाकाला कसल्या गुदगुल्या होतात…हीही ..हीही…” मांजराला आठवूनच हसायला यायला लागलं.
कुठल्याशा विचारात गढून गेलेला बेबलॉश्की आकाशातल्या अंधाराच्या पार नजर लावून बसला होता. गच्चीत आडवा पडला असल्यामुळे त्याला फक्त ठिपकाळलेलं काळं आभाळ आणि त्या बॅकग्राऊंडवर कठड्यावर बसलेलं मांजर तेव्हढं दिसत होतं. मधूनच आकाशाचा काळा गालीचा अंगावर उतरतोय की काय असा त्याला भास होत होता. त्याच्या मनात आलं “कसला भन्नाट प्रकार आहे हा! मी असा आत्ता या आकाशाकडे बघतोय पण हे आकाश काही खरं नाहिये! म्हणजे तारे, ग्रह, ब्लॅक-होल्स इत्यादी वजा करून उरतं ते अभाळ, म्हणजे नसलेलं काहीतरी! नसलेल्या केव्हढ्यातरी मोठ्या कशाकडेतरी मी बघतोय!” हा मजेदार विचार मनात आल्यामुळे बेबलॉश्कीला मस्त वाटू लगलं. तो नकळतच गाणं गुणगुणु लागला. पण ते गाणं मांजराचं विशेष नावडतं होतं! मांजर रागानी फिस्कारलं आणि कठद्यावरच्या अढळ जागेवरून चटकन उडी मारून लांब कोपऱ्यात जाऊन बसलं.
अनेक लोकांनी दार वाजवलं त्या दिवशी! काहींना कसल्या कसल्या बिलांचे पैसे हवे होते तर काहींना काय काय गोष्टी बेबलॉश्कीला स्वस्तात विकायच्या होत्या. पण बेबलॉश्की तरी काय करू शकणार होता? सहा वर्षं पुरतील इतक्या टीकाऊ साबणाच्या वड्या किंवा लहान मुलांच्या गंमत गाणी-गोष्टींचा संच त्याच्या काहीच उपयोगाचा नव्हता. बेबलॉश्कीला वाटलं अशा परीस्थीतीत नेहमीच होतं त्याप्रमाणे त्याला खूप वाट बघायला लागणार आहे. “जेव्हा एखादी गोष्ट पटकन घडावी असं वाटतं तेव्हा ती नेहमीच घडायला उशीर लावते आणि कधी-कधी तर ती घडतच नाही असंही होतं…” प्रत्येक विचरासरशी बेबलॉश्की अजूनच उदास होत होता.
शनिवारची सकाळ होती आणि बेबलॉश्की मुळीच अंघोळीला जायला तयार नव्ह्ता. मांजराने मात्र उठल्या उठल्या अंग चाटून टाकलं होतं आणि ते खाणं मिळण्याची वाट पहात बसलं होतं. बेबलॉश्कीकडे त्याने रागावलेल्या डोळ्यांनी पाहून झालं होतं पण बेबलॉश्की काही बधत नव्हता. शेजारच्या काकू जेव्हा त्याच्यासाठी वाटीभर पोहे घेऊन आल्या तेव्हा त्यांनीसुद्धा बऱ्याच नापसंतीने त्याच्याकडे पाहिलं होतं. त्यानंतरही तासभर बेबलॉश्की पोहे खात टीव्ही समोर बसून राहिला. मांजराला असं वाटलं की आज बेबलॉश्की रात्र होइपर्यन्त काही हलणार नाही आणि त्याला काही खायला देणार नाही. मग मांजर खिडकीबाहेर उडी टाकून खाण्याच्या शोधात निघून गेलं.
